बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथे घाटा पद्धत १५० वर्षाची परंपरा असून नाईक हाटीतील भिलाव कुटुंबाने ती सतत पुढे चालू ठेवली आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात सर्व गावाला गोड घाटा देण्याची पद्धत आहे.याचा मान नाईक हट्टीतील भिलाव कुटुंबातील आजोबा, पणजोबा पासून चालत आलेली परंपरा पुढे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सुरू ठेवली आहे.
१५० वर्षांपूर्वी दला लाला भिलाव यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांचा वारस रुपा दला भिलाव, रतिलाल रूपा भिलाव रवींद्र भिलाव यांनी चालू ठेवलेली आहे. नाईक घरातील सर्व आदिवासी बांधव संपूर्ण गावातून वर्गणी गोळा करतात व मरी माता, महिषासुरची पूजा, ग्रामदेवता पूजा,
हनुमान मंदिर, कोचरा माता, कालिका माता आदि देवतांची पूजा भिलाव कुटुंब करीत असतात या बाबत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत असते.यामध्ये सर्व हाटीतील समस्त नागरिक सामील होत असतात. घाटया साठी लागणारे साहित्य ही सोबतच असते. या सर्व प्रक्रियेत नाईक, भिलाव परिवार व समस्त नाईक हाटी परिवार यांचा समावेश असतो. तसेच नाईक हाटीतील परिवारच गाव दिवाळीचीही पूजा करून गावदिवाळीला सुरुवात करीत असता.
घाटा देण्याचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे पाऊस नाही पडल्यास आषाढ महिन्यात घाटा देण्यात येत असतो व देवतांना याबाबत साकडे घालून गावातील सर्व नागरिकांना सुखी, समाधानी राहू दे.जगू दे, जास्त पाऊस पडू दे, बळीराज्याला अधिक धान्य मिळू दे ,असे देवतांना साकडे घालण्यात येत असते.
प्रथम घाटामधून नाईक हाटीतील समस्त परिवाराने प्रसाद ग्रहण केल्यानंतरच गावातील करडे हाटी, भट्टी हाटी, नवा प्लाट, इंदिरानगर,कलमाडी हाटी हे घाटा देत असतात.मग तो गोड ही असतो किंवा तिखट ही असतो.प्रथम नाईक घरालाच प्रथम मान दिला जातो हे या गावाचे वैशिष्ट्य होय. गावात घाटा हा गावातील सर्व मान्यवरांच्या सहकार्याने होत असतो.








