नंदुरबार l प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान टप्पा 3.0 च्या नाव नोंदणीसाठी प्रारंभ झाला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन या अभियानात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले .
माझी वसुंधरा अभियान टप्पा 3. 0 साठी जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांसाठी प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) राजेंद्र पाटील ,शहादा गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रशिक्षक अनिल राणे , अभिमन्यू आहेर आदी उपस्थित होते .
यावेळी प्रशिक्षणात प्रशिक्षक अनिल राणे ,अभिमन्यू काळे यांनी माझी वसुंधरा अभियानाचे महत्त्व विशद करून अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी कोणकोणते उपक्रम राबावेत तसेच अभियानात सहभागी होण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर कशी नोंदणी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , अतिरिक्त कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी पृथ्वी , जल , वायू , अग्नी व आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण ही काळाची गरज असून माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी ग्रामसेवक व पदाधिकारी यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान टप्पा दोन अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीरामपूर , धानोरा तालुका नंदुरबार , बामखेडा त तत , वडाळी , प्रकाशा , लोणखेडा , पुरुषोत्तमनगर ,कलसाडी ,खेडदिगर , ब्राह्मणपुरी ,मलोणी तालुका शहादा , राजमोही मोठी तालुका अक्कलकुवा , तळवे व गणेश बुधावल तालुका तळोदा ,

खोकसातालुका नवापूर येथील ग्रामसेवक यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शहादा गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तळोदा गटविकास अधिकारी पी.पी .कोकणी व नवापूर गट विकास अधिकारी सी . के . माळी व सर्व संबंधित विस्तार अधिकारी यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर झेंडा ‘ या उपक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले .








