तळोदा l प्रतिनिधी
अमरनाथच्या पवित्र मंदिराजवळ ढगफुटीच्या घटनेने यात्रेकरूंना त्रास झाला असून या घटनेत किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ४० हून अधिक लोक बेपत्ता आहेत, तळोदा येथून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या ४ भाविक ज्या ठिकाणी ढगफुटी झाली त्याच भागात अडकले आहेत.
याठिकाणी भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी बचावकार्य सुरू केले आहे.दरम्यान तळोदा येथील ७० ते ७५ भाविक शुक्रवारी सुखरूप घरी पोहचले.
याबाबत अधिक माहिती अशी की तळोदा शहरातून विविध भागातून सुमारे ७० ते ७५ भाविक दुसऱ्या समूहाचे रिझरवेशनात आठ दिवसांपूर्वी रेल्वेने अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. त्यापैकी सर्वच भाविक अमरनाथ यात्रेतून गुरुवारी व शुक्रवार रोजी सुखरूप घरी पोहचले.
तर दि. ३ रोजी काकाशेठ गल्ली येथून सुरत मार्गे ४ भाविक रेल्वेमार्गे यात्रेसाठी रवाना झाले आहेत. दि. ८ रोजी यात्रेकरू इच्छितस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पंचतरणी ते अमरनाथ गुफेकडे जाणारी टेकडी चढण्यास सुरुवात केली होती.
ज्यावेळी त्यांनी वरती जाण्यास सुरुवात केली त्यावेळी वातावरण चांगले होते. मात्र सायंकाळी साडेचार-पाच वाजेच्या दरम्यान अमरनाथ गुहेच्या जवळ अचानक मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने धो-धो पाऊस बरसू लागला यामुळे भाविक तेथेच अडकले.
खाली आलेल्या यात्रेकरूंना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत मदत कार्याच्या मदतीने सुखरूप स्थळ गाठले. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने त्यांना पुन्हा मदतकार्यासाठी आलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पंचतरणी येथे हलविण्यात आले.
यावेळी त्यांच्यापैकी विकासदीप राणे, व कुलदीप राणे, यांनी आपबिती कळविली व सध्या सुखरूप स्थळी हलविण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय परिस्थिती अतिशय वाईट होती. १२ ते १५ भाविक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अनेक जण मलब्यात अडकले असल्याचे सांगितले.या ढगफुटीमुळं सध्या अमरनाथमध्ये हजारो भाविक अडकून पडले आहेत. यामुळं नातेवाईकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. बचावाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.








