चिनोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रांझणी येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र यावर्षी विठूरायाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले असून त्याचबरोबर परिसरात पावसाने चांगला जोरही धरल्याने परिसरात समाधान असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान श्री विठ्ठल-रुखमाई सेवा समितीतर्फे मंदिराची रंगरंगोटी तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून समितीतर्फे मोफत फराळ वाटप, महिला भाविकांना विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरातून दोन वर्षानंतर चिनोदा, मोड, प्रतापपूर, तळवे, मोहिदा, सद्गगव्हाण, बोरद रंजनपूर, पाडळपूर, नवागांव, सलसाडी आदी गावातून पायी दिंडी येणार असून पालखी सोहळा, रिंगण सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे.
यावर्षी विठ्ठल-रुखमाईचा महापूजेचा मान दिनेश परमसुख तंवर व सौ.लताबाई दिनेश तंवर (अक्कलकुव्वा) यांना मिळाला असून काकड आरती मंदिराचे पूजारी दिलीप जाधव व सौ.वैशाली जाधव यांच्या हस्ते होणार आहे. तसेच श्रीहरीची पालखी मिरवणूक ह.भ.प.आत्माराम भजनी मंडळ, रांझणी यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.