नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे मुक्त विद्यापीठाचा शेवटचा पेपर आटपून परस्पर आठ मित्र पोहण्यासाठी शहराला पाणीपुरवठा करणार्या विरचक धरणात गेले असतांना गाळमध्ये फसून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नंदुरबारात एकच खळबळ उडाली. दरम्यान उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील युवक त्यांचे काल यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा एफवायबीएचा शेवटचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर सर्व मित्र मिळून परस्पर नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्या विरचक धरणात पोहण्यासाठी गेले.
यावेळी दिपक वाकडे, कल्पेश सोनवणे, रोहित पवार, चेतन राजपूत, राजकिरण कुवर, रोहित भदाणे, सुनिल बर्डे व एक एकजण असे एकूण ८ मित्र होते. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्या विरचक धरणात पाणीसाठा कमी असल्याने मोठया प्रमाणावर गाळ साचला आहे.
धरणात हे विद्यार्थी पोहत असतांना दिपक वाकडे व कल्पेश सोनवणे हे धरणाचा मध्यभागापर्यंत गेले. त्याठिकाणी गाळ असल्याने दिपक वाकडे व कल्पेश सोनवणे या दोघांचा त्यात पाय अडकला. त्यातच दिपक सुनिल वाकडे (वय १९ रा.नंदुरबार) व कल्पेश भगवान सोनवणे (१९ रा. पथराई ता.नंदुरबार) यांचा मृत्यू झाला. त्यांना रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
काल दि.७ जुलै रोजी दुपारी २.३० ते ३ वाजे दरम्यानची घटना आहे. यातील दिपक सुनिल वाकडे हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुनिल वाकडे यांचा मुलगा आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक तसेच मित्र परिवाराने जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती.
त्यांचा मृत्यूमुळे परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अप्पर अधीक्षक विजय पवार , उपाधीक्षक सचिन हिरे , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर , शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर , तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली . गतवर्षी या धरणामध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.








