नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बोरविहीर येथे प्रेमविवाहाच्या रागातून युवकाचा चाकुने पोटात वार करुन जिवेठार मारणार्या ३ आरोपीतांना जन्मठेप व प्रत्येकी १४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अजय राजाराम गावीत रा . बोरविहीर ता . नवापूर या तरुणाने त्याच्या घराजवळ राहणार्या मनिषा सखाराम गावीत हिच्याशी प्रेमसंबंधातून पळून जावून प्रेमविवाह केला . या गोष्टीचा मनिषा गावीत हिचे वडील सखाराम नरशी गावीत , भाऊ समुवेल सखाराम गावीत , संदीप सखाराम गावीत यांना प्रचंड राग आला .
दि.१२ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सखाराम गावीत , समुवेल गावीत , संदीप गावीत असे अजय राजाराम गावीत याचे घरात शिरले . त्यांनी अजय गावीत यास शिवीगाळ केली .
त्याचवेळी संदीप सखाराम गावीत याने अजय राजाराम गावीत याचे छातीवर चाकूने वार करुन त्यास जिवेठार केले . तसेच सखाराम गावीत यांनी अजयची आई सावित्रीबाई राजाराम गावीत हिच्या पोटात त्याच चाकूने वार करून तिला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला .
याशिवाय समुवेल गावीत याने अजयचे वडील राजाराम गावीत यांना हाता पायावर काठीने जबर मारहाण करुन दुखापती केले . त्यानंतर मयत अजय गावीत याचा भाऊ प्रकाश राजाराम गावीत यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२ ,३०७,३२६, ३२४,४५२, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा खूनासारखा गंभीर असल्यामुळे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी गुन्ह्याची सर्व सुत्रे हाती घेत गुन्ह्याचा तपास स्वतः केला .
तसेच गुन्ह्यातील तिन्ही आरोपीतांना गुन्हा घडलेच्या दिवशी दि.१३ मार्च २०२१ रोजी गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेल्या चाकूसह अटक करण्यात आली होती . नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते . तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग -१ , नवापूर यांच्या न्यायालयात सादर केले होते .
सदरचा गून्हा हा खूनासारखा गंभीर असल्यामुळे तो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला होता . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नंदुरबार यांनी साक्षीदारांचे जबाब , पंच , जप्त मुद्देमाल , आणि परिस्थितीजन्य पुरावे , तपास अधिकारी यांची साक्ष यासर्व बाबींचा विचार करत तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाच खटला चालविण्याचे ठरविले .
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नंदुरबार आर . एस . तिवारी यांनी अतिशय जलदगतीने खटला चालवुन खटल्याची सुनावणी पूर्ण करुन तिन्ही आरोपीतांना जन्मठेप व प्रत्येकी १४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे . सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी केला असून
न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अति . जिल्हा सरकारी वकील ऍड . व्ही.सी. चव्हाण यांनी पाहिले असुन पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार नितीन साबळे , पोलीस नाईक गिरीष पाटील यांनी कामकाज केले होते .