नवापूर l प्रतिनिधी
नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात डिझेल टँकरचा ब्रेक फेल झाल्याने वळणावर टँकर पलटी झाल्याने अपघात झाला आहे.अपघातात चालक अरविंद गुप्ता गंभीर जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोलची गळती सुरू झाली. बुधवारी साडे चार वाजेच्या सुमारास टँकरचा अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालत पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. ड्रम, बाटल्या, घरात मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे.

नवापूर पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर टँकर घाटात कोसळल्याने अपघात झाला. टँकर मधील पाच कप्प्यामधून २४ हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल घाटात वाहू लागले. इंधन रोडावर आल्याने या इंधनामुळे अनेक मोटरसायकली घसरून देखील पडल्या.टँकर पलटी झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्याने या परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालत पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. ड्रम, बाटल्या, घरात मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे. टँकरमध्ये जवळपास २४ हजार लीटर डिझेल व पेट्रोल होते. संध्याकाळपर्यंत टँकरमधून गळती सुरू होते घटनास्थळी अग्निशमन दलाला उशीराने पाचारण करण्यात आले.हजारो लिटर पेट्रोल व डिझेल गळतीमुळे वाहून गेले आहे.
रिलायन्स कंपनीचे नवापूर येथील बालाजी पेट्रोलपंपाचा टँकर होता. मुंबईहून इंधन भरून नवापूरच्या दिशेने येत असताना अपघात झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, पोलिस कर्मचारी शाम पेढारे, अलताफ शेख,गणेश बच्छे घटनास्थळी दाखल झाले.
चरणमाळ घाटातील प्रवास जीवघेणा ठरत आहे तरी संबंधित विभागाने या ठिकाणी उपाययोजना करताना दिसून येत नाहीये दर आठवड्याला एक दोन अपघात होत आहे. उपाययोजनाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
रूग्णवहिका सहा वाजता दाखल
चरणमाळ घाटात अपघातस्थळी सहा वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिका दाखल झाली. टॅंकर चालक अरविंद गुप्ता याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अग्निशमन बंब ६:५० ला दाखल
चरणमाळ घाटातील टॅंकर जवळ अत्यावश्यक सुविधा तात्काळ मागवणे गरजेचे होते.परंतु नवापुर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला उशीराने कळविण्यात आले.अग्निशामन दल ६:५० वाजेला घटनास्थळी दाखल झाले.
सुदैवाने आगीची घटना घडली नाही परंतु अत्यावश्यक सेवा या घटनास्थळी तात्काळ पोहोचणे देखील महत्त्वाचे आहे.
चरणमाळ घाट ज्वलनशील इंधन टँकर पलटी झाल्याने वाहतूक बंद करणे गरजेचे असताना वाहतूक सुरूच ठेवल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली अशा घटना च्या वेळेस ठोस उपाय योजना कडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे सुदैवाने कुठलीही दुर्घटना झाली नसली तरी यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.








