नंदुरबार l प्रतिनिधी
वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्राचे पांडुरंग असलेले विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना वेध लागले आहे.येत्या दहा जुलै रोजी होणाऱ्या देवयानी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आगार सज्ज झाले आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रा होत आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी धुळे विभागातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथील आगार सज्ज झाले आहेत.
भाविकांनी एसटी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.नंदुरबारसह जिल्ह्यातील कोणत्याही गावातून 45 प्रवाशांचा समूह असेल तर त्या गावातून थेट पंढरपूर येथे जाणे व येण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येईल.
ग्रुप बुकिंग साठी व आरक्षणा करिता भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी, भेटीसाठी सुखकर प्रवासाकरीता हक्काची एसटी भाविकांच्या सेवेत सज्ज झाली आहे.अशी माहिती नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.








