नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाजीविका अभियानतंर्गत जिल्ह्यातील महिला सरपंच, समुदायस्तरीय प्रशिक्षण सल्लागार (सीटीसी) व समुदाय संसाधन व्यक्तींचे ‘आरोग्य पोषण व माता स्तनपान ’या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा अभियान संचालक उमेद तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ.मैनक घोष, सह-जिल्हा अभियान संचालक उमेद तथा प्रकल्प संचालक ( डीआरडीअे) राजेंद्र पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉ.शिवाजी राठोड, कार्यशाळेचे तज्ञ प्रशिक्षक डॉ.देवाजी पाटील व जिल्हा समन्व्यक स्तनपान व शिषूपोषण संदीप गुसाळे, डीएमएम यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाची मोहिम अधिक बळकट करण्यासाठी या एक दिवशीय कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले होते. कार्यशाळेत 0 ते 6 वयोगटातील लहान बालकांची सदृढ वाढ व विकासासाठी बालकांना सकस व पोषक आहार मिळण्याचे महत्व, गरोदर व स्तनदा मातांचा सकस व पोषक आहार, कुपोषणबाबत जनजागृती करणे,
समुदाय स्तरावर सकस व पोषक आहाराचे महत्व पटवून देणे, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्यांची काळजी घेणे, स्तनदा मातांनी लहान बालकांना स्तनपान करण्याची योग्य पद्धत कशी असावी. लहान बालक सदृढ व निरोगी राहण्यासाठी आईचे दुध किती महत्वाचे आहे या याबाबतची माहिती चित्रफितीद्वारे या कार्यशाळेत देण्यात आली.
या कार्यशाळेला श्रीमती. मनीषा खत्री, श्री. रघुनाथ गावडे, मिनल करनवाल, राजेंद्र पाटील, यशवंत ठाकूर यांनी उपस्थित कार्यशाळेतील महिलांशी संवाद साधुन जिल्ह्यातील वाढते कुपोषण कमी करण्यासाठी समुदायस्तरावर उमेद अभियानांतर्गत गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य, पोषण व स्तनपानाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत तज्ञ प्रशिक्षक डॉ. देवाजी पाटील व संदीप गुसाळे यांनी कुपोषण, त्याची कारणे, गरोदर मातांचे आरोग्य, बालकांच्या सदृढ आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्व, स्तनपान करण्याची योग्य पद्धत, सकस व पोषक आहार इत्यादी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत 14 हजार 368 महिला स्वयं सहायता समूह स्थापन करण्यात आले असून या समूहांतर्गत 1 लाख 41 हजार 806 महिला उमेद अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत.
उमेद अभियानाच्या माध्यमातून समूहातील महिलांना त्याचे सामाजिक व आर्थिक विकासासाठी दशसूत्री शिकविण्यात येत आहे. या दशसुत्री मध्ये महिला तिच्या कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याला विशेष महत्व देण्यात आले आहे. स्वयंसहायता समूहांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना समुदायस्तरावर योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती,
समुदायस्तरीय प्रशिक्षण सल्लागार म्हणून स्थानिक गावातील सक्रीय महिला यात कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यशाळेला उपस्थित महिला सरंपच,सीटीसी व समुदाय संसाधन व्यक्ती यांना आरोग्य, पोषण व प्रभावी स्तनपान या विषयाचे वाचन साहित्य देखील यावेळी मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी उमेद अभियानाचे जिल्हा व तालुका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला सहा तालुक्यातील प्रत्येकी 25 प्रमाणे 150 पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.