नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेट जवळ डंपर व रिक्षाच्या भीषण अपघातात ॲपेरिक्षा मधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमी प्रवाशांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयातच बराच वेळ त्रास सहन करावा लागला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि 17 जून 2022 रोजी नवापुर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेट जवळ डोगेगावहुन प्रवासी भरून खांडबारा गावाच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षा (क्र. GJ 38, W.1548) ला श्रावणी रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (क्र. GJ 16 X 8359) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रवासी वाहतूक रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.अपघात इतका भीषण होता की याचा आवाज दूरपर्यंत नागरिकांना ऐकू गेला. आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पलटी झालेल्या प्रवासी वाहतूक रिक्षातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका खासगी वाहनातून अपघात ग्रस्त जखमी प्रवाशांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल.
या अपघातात सुरेश संजय गावित, सविता अनिस वळवी रा. जामदा, अमिरा दिनेश वळवी, भामटी अरविंद रा. माऊलीपाडा, अनिस तिकडे रा. जामदा रिक्षा चालक असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
मात्र रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने अपघात ग्रस्त जखमींना रुग्णांना बराच काळ ताटकळत राहावं लागलं. घटनास्थळी अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती खांडबारा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक सुरळीत केली.








