नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील दंगलीची चौकशी होऊन नुकसान करणार्या जमावाकडून भरपाई वसूल करण्यात यावी. तसेच दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे
याबाबत पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अक्कलकुवा येथील झालेली घटना अंत्यत दुर्दैवी असून दंगल घडविण्याचा पुर्वनियोजीत कट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्रीच्या समयी झोपेत असलेल्या निरपराध नागरीकांवर हल्ला करणार्या समाज कंटकांवर,
गांवगुंडावर पोलीसांनी कठोर कार्यवाही करुन ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे, त्या नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दिल्लीच्या एका घटनेचा अक्कलकुवा येथील शांतताप्रिय नागरीकांचा काहीही संबंध नसतांना सुनियोजित पध्दतीने कट करुन हल्ला करण्यात आला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून दंगलखोरांनी दहशत माजविण्याचा जो प्रयत्न केला तो निंदनीय आहे.
दंगलखोरांना पोलीसांनी वेळीच आवरल नसत तर कित्येक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले असते. ईतकी भिषण परीस्थिती उदभवली होती. दंलखोरांच्या जमावाने अनेक नागरीकांच्या वाहनांची, घरांची, दुकानांची तोडफोड करुन लुटमार करण्याचे प्रकार केल्यामुळे अक्कलकुवासह जिल्हयात भितीचे वातावरण निर्माण झाले.
पोलीसांनी या दंगलखोरांचा कसुन शोध घेऊन या मागे असलेल्या परकीय शक्तींना शोधुन काढावे. ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या दंगलग्रस्त नागरीकांना दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करून द्यावी,
अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, उपशहराध्यक्ष राम ठक्कर आदी उपस्थित होते.