नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे दगडफेक प्रकरणी 24 जणांना अटक करण्यात आली आहे.
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहिता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 ( IT ACT 2000 ) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांच्याकडुन वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरीकांना आवाहन करण्यात आले होते .
तरी देखील दि 10 जून 2022 रोजी अक्कलकुवा गावातील राहणारा हरीष पवार नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक आक्षेपार्ह मजुकुरासह फोटो प्रसारीत केला . त्यामुळे एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्यामुळे काही लोक अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता पोलीसांनी तात्काळ अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 153 ( अ ) , 505 ( 2 ) अन्वये गुन्हा दाखल केला .
गुन्हा दाखल करण्याची मागणी घेवुन आलेले आलेले लोक घरी जात असतांना त्यातील काही समाजकंटकांनी आजूबाजूच्या घरांवर दगडफेक केली तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले .
सदरची बाब नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ जिल्ह्यातील धडगांव पोलसी ठाणे , विसरवाडी पोलीस ठाणे , मोलगी पोलीस ठाणे , सारंगखेडा , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून अतिरीक्त पोलीस मदत अक्कलकुवा येथे पाठविली .
तसेच ते स्वतः अक्कलकुवा येथे दाखल झाले . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी दगडफेक व वाहनांचे नुकसान झालेले होते त्या त्या ठिकाणी भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली .
तसेच घाबरलेल्या अक्कलकुवा शहरातील नागरिकांना धीर देवुन घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल करुन आरोपीतांना तात्काळ अटक करुन त्यांच्याविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत घाबरलेल्या नागरिकांना आश्वासन दिले .
सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून तसेच लोकांच्या मनातील भिती नाहीशी व्हावी याउद्देशाने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 307,353 , 143 , 147,148,149,336,427 , 120 ( ब ) सह सार्वजनीक संपत्तीची हानी प्रतिबंधक कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे .
त्याचप्रमाणे काही समाजकंटकांनी एका पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्यामुळे त्याबाबत देखील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे . गुन्ह्यातील आरोपींबाबत पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण माहिती घेवून त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे याउद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी रवाना केले .
त्याअनुषंगाने अक्कलकुवा शहरातील दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान करुन दहशत पसरविणाऱ्या 24 संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकांनी तसेच अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदारांनी आजु बाजुच्या परीसरातून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे .
पोलीसांनी संशयीतांना मोठ्या प्रमाणावर अटक केल्यामुळे व पोलीसांनी परिस्थिती कठोरपणे हाताळल्यामुळे नागरिकांनी पोलीसांच्या कृतीवर समाधान व्यक्त केले आहे .
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील हे स्वत : अक्कलकुवा येथे तळ ठोकून आहेत . तसेच अक्कलकुवा येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी देखील भेट देवून परिस्थितीची पाहणी केली . तसेच पोलीसांनी हाताळलेल्या परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले आहे .
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे काही लोकांसोबत चर्चा करुन अक्कलकुवा येथील परिस्थतीची माहिती घेतली तसेच अक्कलकुवा वासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे .
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्हॉट्सऍप , ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मीक भावना भडकविणाऱ्या दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये .
तसेच नंदुरबार जिल्ह्यतील कोणत्याही व्यक्तींनी कायदा हातात घेवू नये . कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आवाहन केले आहे .