नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा शिवारात श्रीजी पार्कमध्ये एकाच दिवशी चोरट्यांनी दोन धाडसी घरफोड्या करुन सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील पातोंडा शिवारातील श्रीजी पार्कमध्ये राहणारे चेतन हर्षद जोशी व पवन विजय येपुरे यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी केली.
चेतन जोशी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडुन आत प्रवेश करीत चोरट्यांनी ५० हजाराची रोकड , ६० हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन , २० हजार रुपये किंमतीची सोन्याची कानातील कर्णफुली असा एकूण १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे .
त्यानंतर चोरट्यांनी पवन विजय येपुरे यांच्या घराकडे मोर्चा वळवुन दरवाजाचा कडीकोयंडा तोडला . तसेच कपाटातील लॉकर तोड़न १४ हजाराची रोकड , ४ हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम सोन्याची अंगठी व ओम पान अर्धा ग्रॅम असे एकुण १८ हजार किंमतीचा मुद्देमाल लांबविला .
दोन्ही घरफोड्या करुन चोरट्यांनी १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे . याबाबत चेतन हर्षद जोशी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखी चोरट्यांविरुध्द भादंवि कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .