नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा पाडळदा रस्त्या वरील गोमाई नदीच्या पुलाखाली नदी पात्रात अप्रोन काँक्रीट पूर्णपणे निघाले असून मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत.
तसेच पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वारंवार अपघात घडत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे; यात ट्रक चक्काचूर झाला असून चालक व सहकारी जखमी झाले आहे.

गोमाई नदीच्या नदीपात्रातील अप्रोन काँक्रिटीकरण दुरुस्ती करावी तसेच संरक्षक कठडे देखील उभारण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास जनआंदोलन उभे करू असा इशारा दिला आहे.
गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीपात्रात कमी उंचीच्या पुलाचे काम करण्यात आल्याने अपघात घडत आहे. आतापर्यंत या ठिकाणी सहा नागरिकांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. 40 पेक्षा अधिक गावांचा संपर्क असलेल्या या पुलाला संबंधित विभागाने दुरुस्त करावी.
आणखी किती वेळ प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे आणखी किती बळी जातील याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुल कमी उंचीच्या असल्यामुळे पावसाळ्यात मोठा पूर आल्यावर दोन्ही बाजूंची वाहने तासनतास खोळंबली जातात. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.








