नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा ता.शहादा येथे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे एकास महागात पडले असून याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला तलवारीसह अटक केली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूकीच्या अनुषंगाने तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दि. 2 जून 2022 रोजीचे सकाळी 6 ते दि. 16 जून 2022 रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात मनाई आदेश तसेच हत्यार बंदी आदेश लागु केलेले आहेत .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना खात्रीशीर बातमी मिळाली की , नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा ता . शहादा गावातील अजय गावीत याने दि. 5 जून 2022 रोजी प्रकाशा गावातील गौरव हॉटेल जवळ धारदार तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता .
तसेच अजय गावीत याने तलवारीने केक कापल्याबाबतचे फोटो समाज माध्यमांवर वाऱ्यासारखे पसरत असून , त्या फोटोमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे .
सदरची बाब लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना अजय गावीत यास ताब्यात घेऊन त्याचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अमंलदारांचे एक पथक तयार करुन अजय गावीत याच्याबाबत सर्व माहिती काढून त्यास ताब्यात घेण्यासाठी रवाना केले .
स्थानिक गुन्हे शाखेच्या अमंलदारांनी तात्काळ प्रकाशा गावी जावून संशयीत अजय गावीत याची माहिती घेतली असता तो प्रकाशा गावातील मुंजळा हट्टी येथील त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली .
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत अजय गावीत याच्या घराच्या चोहोबाजुंनी सापळा रचुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले .
अजय विजय गावीत रा . मुंजळा हट्टी , प्रकाशा ता . शहादा यास वाढदिवसाबाबत विचारणा केली असता त्याने प्रकाशा गावातील गौरव हॉटेल जवळ तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे कबुल केले .
तसेच ज्या तलवारीने केक कापला होता , ती तलवार अजय गावीत याने काढुन दिल्याने त्याबाबतची कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त करण्यात आली .
अजय विजय गावीत यास धारदार तलवारीसह ताब्यात घेऊन त्याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा व जिल्हाधिकारी , नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असुन अजय गावीत यास अटक करण्यात आलेली आहे .
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , वाढदिवस साजरा करणे हा गुन्हा नाही परंतु तलवार किंवा धारदार शस्त्रांनी केक कापून वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये . तलवार किंवा धारदार शस्त्रांनी कोणी केक कापून वाढदिवस साजरा करतांना आढळून आल्यास किंवा दहशत पसरवितांना मिळून आल्यास त्यांच्याविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , जितेंद्र अहिरराव , पोलीस कॉन्सटेबल किरण मोरे , यशोदिप ओगले यांचे पथकाने केली.