नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याला वैविध्यपूर्ण आणि समृद्ध निसर्ग लाभलेला आहे. जमीन, हवा व पाणी या तीनही प्रकारातील साहसी उपक्रम आयोजित करण्यास राज्यात वाव आहे. पर्यंटन धोरण 2016 अन्वये साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देणे.
तसेच विविध साहसी उपक्रम आयोजक आणि साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची नोंदणी, विनियमन सनियंत्रण, नियोजन, प्रोत्साहन, प्रशिक्षण देणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
साहसी पर्यटन राबविणाऱ्या आयोजकांकरीता नियमावली तयार करुन राज्यात सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यात साहसी पर्यटन उपक्रम धोरण राबविण्यात येत आहे.
साहसी पर्यटन उपक्रम धोरण हे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी तसेच सध्या आयोजित होणाऱ्या व भविष्यात नव्याने सुरु होणाऱ्या जमीन, हवा व पाणी यावरील सर्व साहसी पर्यटन उपक्रमांसाठी हे धोरण लागू राहील.
साहसी पर्यटन उपक्रम धोरणांतर्गत साहसी पर्यटनाशी संबंधित घटकांना शासनाने नोंदणी करणे बंधनकारक केलेले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील साहसी पर्यटनाशी संबंधित संस्था व व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह जमीन, हवा व पाणी या माध्यमातील उपक्रम राबवित असतील त्यांनी त्यांची माहिती उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांच्याकडे
www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.








