नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आमोदा येथे मुलीस पळवून नेल्याच्या संशयावरुन घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले तसेच शिविगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील आमोदा येथून सुभद्रा रविंद्र नाईक यांच्या मुलाने एका मुलीस पळवून नेल्याच्या सशंयावरुन दीपक कालूसिंग शेमळे, संदीप कालूसिंग शेमळे व दतलाबाई कालूसिंग शेमळे या तिघांनी सुभद्रा नाईक यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला.
तिघांनी संगनमत करुन दगड, विटा,काठ्या घेवून सुभद्रा नाईक यांच्या घराचा दरवाजा तोडला.तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, पलंग, फ्रिज,कुलर, सोफा,कपाट, खिडक्यांचे काचा फोडून नुकसान करुन शिविगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत सुभद्रा नाईक यांच्या फिर्यादीवरुन संशयित दीपक शेमळे, संदीप शेमळे व दतलाबाई शेमळे (तिघे रा.आमोदा,ता.शहादा) यांच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५२,४२७,५०४,५०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब पावरा करत आहेत.








