नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम बुथमध्ये एक व्यक्ती पैसे काढत असतांना त्रुटी येत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने मदत करतो म्हणत त्यांच्याकडून पासवर्ड विचारून पैसे काढून देता असे सांगितले.
मात्र त्या अज्ञाताने एटीएम कार्ड अदला-बदल करत पोबारा केला असून दुसऱ्या एटीमधून अज्ञाताने त्यांच्या खात्यातून 80 हजारांची रोकड काढून नेली आहे. याप्रकरणी शहादा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील दीपक निकुंभे हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीमध्ये गेले होते. दरम्यान पैसे निघत नसल्याने अडचणी येत होत्या. यावेळी मागुन आलेल्या अज्ञाताने त्यांच्या पासवर्ड माहिती करून घेत त्याच्याकडील एटीएम कार्डची फेरफार करून त्यांची दिशाभूल केली आहे.
अज्ञात व्यक्ती ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरासह तालुक्यातील नागरीकांना ही व्यक्ती आढळल्यास मोबाईल नंबर 9423905155 सह शहादा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.








