नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दोन महिन्यांपासून निधी येवूनही पडून आहे. त्यामुळे लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. घेतले. कागदोपत्री त्रुटी काढून निधी पडून असून यासाठी लघुसिंचन विभागाच्या अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
नंदुरबार येथे स्थायी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बैठकीत शिक्षण सभापती अजीत नाईक, कृषी सभापती गणेश पराडके, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी सभेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान लघुसिंचनचा आढावा घेतांना जि.प.अध्यक्षा चांगल्या संतापल्या. मागच्या आर्थिक वर्षात लघुसिंचनला निधी आला असतांना त्याबाबत तक्रार आल्यानंतर चौकशीत वेळ घातल्यामुळे निधी परत गेला.
गेल्या दोन महिन्यापुर्वी लघुसिंचन विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षासाठी ३ कोटीपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे. मात्र लघुसिंचन विभागाने आतापर्यंत कुठलाही खर्च केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी संतप्त झाल्या होत्या.
त्यांनी सांगिले की, लघुसिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दिरंगाईचा फटका नागरीकांना बसत आहे. दोन महिन्यांपासून निधी प्राप्त होवूनही अद्याप पडून आहे.
लघुसिंचन विभागातर्फे याबाबत कुठलीही निविदा काढण्यात आलेली नाही. कागदोपत्री त्रुटी काढून कामात दिरंगाई करण्याचा प्रमाण अधिकारी व कर्मचार्यांनी कमी करावे. तसेच पावसाळ्याचा आधी जिल्ह्यातील कामे होणे अपेक्षीत होते. मात्र ते झालेले नाही. लघुसिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निधी जास्त जास्त खर्च कसा होईल. याकडे लक्ष द्यावे असे सांगत जि.प.अध्यक्षा ॲड.वळवी यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
दरम्यान काही दिवसात पावसाळा सुरू होत असून अद्यापही शिक्षण विभागाकडे निधीवर्ग न करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या पडक्या इमारती अद्यापही इमारतीबाबत कुठलीही कामे झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडे निधीवर्ग करण्यात याव्या अशा सूचनाही यावेळी जि.प.अध्यक्ष ॲड.सीमा वळवी यांनी दिल्या. दरम्यान काल झालेल्या स्थायी सभेत आचारसंहितेमुळे विकासकामांना मंजूरी देण्यात आलेली नाही.