नंदुरबार | प्रतिनिधी
गहाण ठेवलेल्या शेतात घर बांधले याचा राग आल्याने कुर्हाडीने एकाचा खून केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील गमणचा पाटीलपाडा येथे घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील गणमनचा पाटीलपाडा येथे खाअल्या गोविंद वसावे यांनी तापसिंग वसावे यांचे वडील जलता वसावे यांच्या मालकीचे शेत गहाण ठेवले होते.
या शेतात खाअल्या वसावे यांच्या मुलगा बिजा वसावे याने घर बांधल्याचे वाईट वाटून तापसिंग वसावे यांनी खाअल्या गोविंद वसावे (६० रा.गमनचा पाटीलपाडा ता.अक्कलकुवा) यांच्या मानेवर व पोटावर कुर्हाडीने वार करून जिवेठार मारले.
याप्रकरणी मोगरा भावसिंग पाडवी रा.डनेल (ता.अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरून तापसिंग पारशी वसावे रा.गमनचा कोहनाबारीपाडा (ता.अक्कलकुवा) याच्या विरूध्द मोलगी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि धनराज निळे करीत आहेत.