नंदुरबार l प्रतिनिधी
कोळदा-खेतिया रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु होती. याबाबत नागरिकांचा रोष पाहता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी कोळदा-खेतिया रस्तेकामाची, गोमाई नदी पूल, प्रकाशा पूल व अपघातस्थळाची पाहणी केली.
यावेळी रस्त्याचे व पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

गेल्या तीन दिवसांपूर्वी बहुरुपा येथील एका तरुण शेतकऱ्याचा अपघातादरम्यान मृत्यू झाला. रस्त्याचे काम निकृष्ठ असल्याने अपघात घडला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामाबाबत बऱ्याचदा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत.
याबाबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याची दखल घेत काल जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी सायंकाळी कोळदा-खेतिया रस्त्याची पाहणी केली. कोरीटजवळ काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांजवळ कैफियत मांडली.
जमीन संपादीत होवून देखील मोबदला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावर जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी ऑनलाईन प्रक्रिया असल्याने वेळ लागत असल्याचे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
जमीन गेलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला नक्की मिळेल, अशी खात्री शेतकऱ्यांना दिली. मात्र सदरचे रस्तेकाम आपल्याच सोयीसाठी असल्याने कामाला सुरुवात करु द्यावी, अशी विनंती केली. दरम्यान, यावेळी बहुरुपा येथील मयत सचिन पाटील यांच्या नातेवाईकांनी घरातील कर्ता पुरुष हरपल्याने त्यांच्या कुटूंबियांसाठी मदत मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावर शक्य ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिले.
गोमाई नदीवरील पुलाच्या पाहणीदरम्यान पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे आढळून आले. तसेच दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांची शक्यता आहे. रस्तेकाम करतांना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे आढळून आल्याने व निकृष्ठ काम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांसह ठेकेदाराची कानउघाडणी केली.
दरम्यान, पुढील आठवड्यात संबंधित विभागाची महत्वपूर्ण बैठक बोलावून कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. दरम्यान, प्रकाशा येथील हरी पाटील यांनी पुलाचे काम करतांना जवळच प्रकाशा गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आहे.
कामादरम्यान गावाचा पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. यामुळे आधी प्रकाशा गावाला तात्पुरता पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. तसेच संबंधित ठेकेदार व अधिकारी प्रशासनाची दिशाभूल करत असल्याने आणखी दोन वर्ष काम होणार नाही.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी यापुढे स्वत: सदर कामासाठी पाठपुरावा करणार असून काम तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.








