नंदुरबार l
मानवी जीवनात अनेक घडामोडी होत राहतात. राजकीय, आर्थिक, युद्ध, पेट्रोलचे चढते-उतरते भाव, प्रदूषण यामुळे मानवी जीवन धकाधकीचे झाले. परंतु अवकाशीय घटना निरंतर चालत आलेल्या आहेत.
त्या सातत्याने घडताहेत. त्यात एका दिवसाचा फरक पडला तर पडला. परंतु त्या सतत घडत राहतात. या अवकाशीय घटनांमध्ये ताऱ्यांचा उदय आणि अस्त उल्कापात, पारगमन आणि सावल्यांचा खेळ.
सावल्यांच्या खेळामध्ये चंद्र आणि सूर्याचे ग्रहण महत्वाचे असत. परंतु वर्षातून दोन वेळा आपल्या स्थानिक क्षेत्रात एक घटना अशी घडते ज्याकडे मनुष्य, शिक्षक, विद्यार्थी यांचे फारसे लक्ष नसते. ती घटना म्हणजे “शून्य सावली दिवस”.
वर्षातून दोन वेळा घडणाऱ्या घटने पैकी ही एक घटना. महाराष्ट्राचा विचार करता मे आणि जुलै महिन्यात होत असते. पैकी जुलै महिन्यात पावसाळा असतो. आकाश निरभ्र नसते. म्हणून आपण ते पाहू शकत नाही आणि मे महिन्यात उन्हाळा व सुट्टीचा असल्याने या घटनेचा आनंद आपल्याला सहज घेता येऊ शकतो.
शून्य सावलीचा अर्थ म्हणजे लंबरूप सूर्यकिरण पडणे. सूर्यकिरण लंबरूप पडणे साठी सूर्य डोक्यावर आला पाहिजे. तो अगदीच डोक्यावर येत नाही याचे कारण पृथ्वीचा कललेला आस. पृथ्वीचा काल्पनिक आस २३.५ अंशाने कललेला आहे.
याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर ऋतूचक्र होत असते. तसेच दिवस आणि रात्रही असमान होत असतात. या आसाच्या कलल्यामुळे वर्षातून दोन वेळा १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र होते. यामुळे सुर्याचे भासमान भ्रमण जसे पूर्व-पश्चिम होते. तसेच २३.५ अंश उत्तर व २३.५ अंश दक्षिण असे होते.
यालाच उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हणतात. यावरून दक्षिणेला विषववृत्ताच्या खाली मकरवृत्त व उत्तरेला विषववृत्ताच्या वर कर्कवृत्त तयार झालेत. सुर्य वर्षभरात या दोन वृत्तांमध्येही सरकत असतो.
१४ जानेवारीला मकर संक्रांत म्हणजे सुर्याचा मकरवृत्तावरचा प्रवास थांबतो. व तो कर्कवृत्ताकडे सरकतो. भारताच्या बाबतीत सांगायचे तर कन्याकुमारीला शून्यसावली दिवस १० एप्रिलला येतो.
मुंबईला १५ मे ला तर नंदुरबार शहरासाठी २७ मे हा दिवस आहे. कर्कवृत्ताच्या पलिकडे आणि खाली मकरवृत्ताच्या पलीकडे असा दिवस अनुभवता येत नाही नंदुरबार जिल्ह्यात तालुका निहाय नवापूर २६ मे, नंदुरबार २७ मे, शहादा २८ मे, तळोदा- २८ मे, अक्कलकुवा २८ मे तर धडगाव- ३० मे अशा तारखा असतील. तर धुळे – २५ मे, साक्री २५ मे, शिंदखेडा-२७ मे, शिरपूर- २७ मे अशा तारखा असतील.
शून्यसावली अनुभवण्यासाठी आपल्या गावाची स्थानिक वेळ माहित असणेही आवश्यक आहे. घड्याळात जेव्हा १२ वाजतील त्या वेळेला नंदुरबार च्या स्थानिक वेळ प्रमाणे १२:३० झालेले असतील म्हणून ही घटना १२ वाजेच्या पुढे अनुभवता येईल. आपण घरीच या घटनेचा अनुभव घेवू शकतो.
यासाठी आपल्याला आपल्या गावाचा शून्य सावलीचा दिवस, रेखांश किंवा स्थानिक वेळ व प्रमाण वेळेतील फरक माहित पाहिजे. या शिवाय घड्याळ, पाईप, सळई, खांब अशा सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू घेवून आपण शून्य सावलीची मजा घेवू शकतो.
त्यासाठी काही दिवस अगोदरच आपण पाईप किंवा सळई किंवा लाकडाची दांडी जमिनीत लंब राहील अशी गाडावी. किंवा छतावर टाक्यांचे नळ असतात त्यांचाही आपण उपयोग करू शकतो. फक्त काही दिवस या वस्तूंची जागा बदलू नये. मोबाईल कॅमेराने वेगवेगळ्या दिवसांचे फोटो घेवून सावली अशी साथ सोडते हे आपण पाहू शकतो.
मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने विद्यार्थी घरी असतात. त्यामुळे विद्यार्थी व हौशी भूगोल प्रेमींना ही पर्वणीच असणार आहे. शिवाय यातील प्रयोगांसाठी खर्चही येणार नाही. इ. ९ वी ते १२ वी च्या अभ्यासक्रमात प्रकल्प कार्य आहे.
यावर प्रकल्प करून तोच आपण वार्षिक परीक्षेत सादर करू शकतो. भूगोल हा विषय केवळ वाचून पाठांतर करण्याचा नसून त्यात अनेक प्रयोग करून पडताळाही पाहाता येतो हे आपल्याला कळेल.
या लेखात मी मुद्दाम धुळे व नंदुरबार तालुक्यातील तारखा दिल्या आहेत. जेणेकरून या जिल्ह्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, निरीक्षक, हौशी, खगोलप्रेमी निरीक्षण करू शकतील नंदुरबार जिल्ह्यातील श्री आशापुरी माता फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर संचलित नक्षत्र छंद मंडळातर्फे २६ मे ते ३० मे या काळात निरीक्षण केले जाणार आहे. तरी आपण या घटनेचे साक्षीदार होवू या.
यासाठी नक्षत्र छंद मंडळाने वैज्ञानिक उपकरणांचीही निर्मिती केली आहे. त्यात सोलर डायल, पृथ्वीच्या कललेल्या आसाचे मॉडेल, उत्तरायण-दक्षिणायनाचे मॉडेल अशा व यासारख्या अनेक मॉडेलव्दारे निरीक्षणे घेता येणार आहेत.
सौ. चेतना दिनेश पाटील (खगोल अभ्यासक)
नक्षत्र छंद मंडळ, नंदुरबार,
उपशिक्षक-हि.गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
मोबा. 9420755513