नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बेलीपाडा येथे पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीच्या ताब्यातून सोडविल्याच्या रागातून एकास लोखंडी सळईने डोक्यावर मारुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील बेलीपाडा येथील दिलवरसिंग होनजी वळवी हा त्याच्या पत्नीस मारहाण करीत होता.
यावेळी हारसिंग कोथा वळवी याने मारहाण करणाऱ्या दिलवरसिंग वळवी यांच्या पत्नीस त्याच्या ताब्यातून सोडविले. याचा राग आल्याने दिलवरसिंग वळवी याने हारसिंग वळवी घराकडे जात असतांना हातातील लोखंडी सळईने पाठीमागून डोक्यावर मारुन गंभीर दुखापत करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मंगलसिंग कोथा वळवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात दिलवरसिंग वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.