मुंबई l
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे . त्याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे . तुर्तास अयोध्या दौरा स्थगित असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे .
आजारपणामुळे राज यांचा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली होती . राज ठाकरे स्वतः याबाबत घोषणा करतील असे सांगण्यात येत होते . त्यानुसार आता त्यांनी याबाबतची घोषणा सोशल मीडियातून केली आहे . राज यांच्या पायाचे दुखणे काही थांबत नाही . त्यावर ऑपरेशन करण्याचीही गरज असल्याचे सांगण्यात येत आहे .
त्यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार का हा प्रश्नच आहे . तसेच उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर विरोध केला आहे .
रामाच्या वंशजांना मारहाण करणाऱ्यांना अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही , असे त्यांनी आधीच स्पष्ट केले . त्याचवेळी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ते त्यांच्या मोठ्या कार्यक्रमाची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत .
श्रद्धा आणि तत्त्वज्ञानासाठी अयोध्येत यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे , मात्र राजकारण करायला आल्यास उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येऊ देणार नाही , असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले होते . राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर यामुळेही परिणाम झाल्याची चर्चा आहे .