नवापूर | प्रतिनिधी
नवापूर शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित यांचे पूत्र धनंजय गावित युवा मंचतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हंडा मोर्चा काढूनदेखील नगरपालिकेला जाग येत नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील काही भागात पाण्याची कमतरता भासू लागली आहे.
पाणी टंचाईमुळे काही दिवसांपुर्वी भारतीय जनता पार्टीने लाखानी पार्क, देवळफळी, शास्त्रीनगर, लालबारी या भागातील महिलानी हंडा मोर्चा काढला होता. पाणी पुरवठा सभापती हारुण खाटीक यांनी पाणी टंचाई नाही असे सांगून तांत्रिक कारण पुढे केले होते. मात्र लाखानी पार्क येथे प्रत्यक्ष जाऊन तेथील रहीवासींना पाण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी रमजान महिन्यापासून पाणी येत नाही.कॉलनीशेजारी एक विहिर आहे. त्यातून आम्हाला पाणी पुरवठा होत असतो, असे नागरिकांनी सांगितले. रमजान महिन्यापासून या विहिरीचे पाणी आटल्यामुळे पाणी मिळत नाही.भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचे सुपूत्र धनंजय गावित युवा मंचकडून पाणी पुरवठा होत आहे. युवा मंचच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला तेव्हा रोज ट्रँकरव्दारे पाणी मिळत आहे. मात्र हंडा मोर्चा काढुन सुध्दा नवापूर नगरपालिकेला जाग आली नाही अशी प्रतिक्रिया लाखानी पार्क येथील रहिवासी शाहरुख खाटीक व महिलांनी दिली.








