नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील घरकुलमध्ये खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या व वाद मिटविण्यासाठी समजविण्यास गेलेल्या पोलीस अंमलदारास धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयासमोरील घरकुलमध्ये खून झाला आहे , अशी खोटी माहिती सिमा प्रफुल्ल पाटील यांनी फोनद्वारे पोलीस ठाण्याला दिली . तसेच शहर पोलीस ठाण्याच्या बाहेरील आवारात आल्यानंतर गुड्डीखान मोईनखान व तिची आई माया युनुस कुरेशी यांना सिमा प्रफुल्ल पाटील , संगिता शांताराम पाटील या दोघींनी शिवीगाळ करुन वाद घातला . यावेळी समजविण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अंमलदार गणेशा रुतु गावीत यांना सिमा पाटील , संगिता पाटील या दोघींनी धक्काबुक्की करीत दमदाटी केली . तसेच तुम्ही आम्हाला शिकवु नका , असे बोलुन तुमच्याविरुध्द तक्रार देवु , अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला .
खून झाल्याची दिली खोटी माहिती याबाबत मपोशि.गणेशा रुतु गावीत यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार सिमा प्रफुल्ल पाटील , संगिता शांताराम पाटील या दोघांविरुध्द भादंवि कलम ३५३ , ५०४ , १८२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत .