नंदुरबार l प्रतिनिधी
मनुष्य ही जात व मानवता हा धर्म या संत परंपरेचा शिकणवीचा प्रत्यय नंदुरबारकरांना आला. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवंदडा, ता.अलिबाग, जि.रायगड (महाराष्ट्र) यांच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले राज्याचे स्वच्छतादूत तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात तळोदा, शहादा, दोंडाईचा, खेतिया, सोनगड यासह नंदुरबार स्मशानभूमी, कब्रस्थान व ख्रिश्चन दफनभूमी येथे स्वच्छता करुन एकात्मतेचे दर्शन घडविले. या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे तीनशे सदस्य सहभागी झाले. सहा स्मशानभूमी, पाच कब्रस्थान व एक ख्रिश्चन दफनभूमीमधील एकुण चाळीस हजार पाचशे चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. वाढलेली झाडेझुडपे काढून एकुण ३३ टन पालापाचोळा, वाढलेले गवत, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स इतर कचर्याचे संकलन करुन डम्पिंग ग्राऊंडवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकण्यात आला.
नंदुरबारमधील अबुलगाझी कब्रस्थान येथे मुनाब हाजी पिंजारी, हाजी गफार, हाजी शकील, इस्माईल, फिरोज हाजी गुलाम, रहमद खॉं पठाण, नईमोद्दीन अब्दुल जब्बार यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तसेच ख्रिश्चन दफनभूमी येथे रेवरेन फादर, अनुपम वळवी, पिंटी लवणे, डॉ.मधुकर हिवाळे, राजेंद्र व्यास यांच्यासह अनेक ख्रिश्चन बांधवांनीही सहभाग घेतला. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, या पंक्तिचा प्रत्यय या स्वच्छता मोहिमेहतून दिसून आला.