नंदुरबार l प्रतिनिधी
लहान मुलांचे व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी बालनाट्य प्रशिक्षण हे खर्या अर्थाने महत्त्वाचे आहे. नाटकाच्या विविध अंगांचा अभ्यास तसेच उच्चारशास्त्र, संवाद कौशल्य शिकण्यासाठी हे शिबीर नक्कीच उपयोगी पडेल, असे प्रतिपादन नाट्यकर्मी रवीदा जोशी यांनी केले. ते बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नंदुरबार शहरातील राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऋचा जोशी, ग.स. बँकेचे संचालक जे.एन.पाटील, राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, पत्रकार तथा अभिनेता रणजीत राजपूत, प्रशिक्षक आसेफ अन्सारी, अभिजीत भातलोंढे, मनोज सोनार आदी उपस्थित होते. याप्रसंगी जे.एन.पाटील म्हणाले की, नाट्य प्रशिक्षणाची गरज खर्या अर्थाने लहान कलावंतांसाठीच असते. ज्याने भविष्यात नाट्य चळवळ जोमाने घडू शकते. यावेळी प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना प्रशिक्षणार्थी बालकलावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार राहुल खेडकर यांनी मानले. या दहा दिवसीय बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठीचे आवाहन नागसेन पेंढारकर यांनी केले. या बालनाट्य प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार, रवींद्र कुलकर्णी, चिदानंद तांबोळी, जितेंद्र पेंढारकर, गिरीश वसावे, गणेश महाजन आदी परिश्रम घेत आहेत.