तळोदा l प्रतिनिधी
ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा वटवृक्ष सार्या राज्यात वाढला आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य सुरू आहे.ग्राहकांच्या हित तसेच सेवा व हक्क,अधिकारांसाठी संघटना सदैव तत्पर राहील, प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय सचिव प्रा.डॉ. ए. बी. महाजन यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र नंदूरबार जिल्हा कार्यकारणी बैठक आज रविवार रोजी तळोदा येथे घेण्यात आली.बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विभागीय सचिव प्रा.डॉ. ए. बी. महाजन उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष प्रा. आर.ओ. मगरे होते.या जिल्हा बैठकीस नाशिक विभाग सहसचिव श्रीकांत पाठक,जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, शहादा तालुका अध्यक्ष उदय निकुंभ, तालुका संघटक प्रमोद वाणी,नवापूर तालुकाध्यक्ष विजय चव्हाण ,के.के सोनार,पी.जी.उमराव, डॉ.विलास काकडे, प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, नंदुरबार येथील डॉ. गणेश ढोले, बी. डी. गोसावी, केडी गिरासे, ग्राहक पंचायत तळोदा शाखा सचिव रमेशकुमार भाट, ॲड. अल्पेश जैन, दत्तात्रय सागर,रसिला देसाई,अल्फाबेन तुरखिया,अतुल सूर्यवंशी,आदी उपस्थित होते.
बैठकीत ग्राहक पंचायतीचा कामकाजाचा विस्तार ग्रामीण भागात करणे व ग्राहक पंचायत ग्रामीण भागात पोहोचवण्याच्या निर्णय करण्यात आला. त्याच प्रमाणे जास्तीत जास्त लोकांना ग्राहक पंचायतीचे सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की आगामी शालेय वर्षापासून प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जनसंपर्क अभियान राबवून विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघाची माहिती देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. असे सांगितले. पुढील काळात ग्राहकांच्या समस्या जास्तीत जास्त प्रमाणात हाताळणे, प्रवासी महासंघाने ग्रामीण भागात बंद असलेल्या एसटी बसेस पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा,इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष आर. ओ. मगरे यांनी सांगितले की, सर्व साधकांच्या सहकार्याने आणि एक दिलाने ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा यशाकडे वाटचाल करणार आहे. संघटित शक्तीतून प्रत्येकाने आपल्या कार्याच्या माध्यमातून झोकून द्यावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक ग्राहक पंचायत तळोदा शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ संजय शर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी ग्राहक पंचायत ,प्रवासी महासंघाचे तळोदा शाखेचे अध्यक्ष राजेश चौधरी,सचिव पंडित भामरे, उपाध्यक्ष मुस्तुफा हुसेन, महेंद्र सूर्यवंशी, हंसराज महाले आदीनी परिश्रम घेतले.