नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा कारागृह नंदुरबार येथे अटकेत असलेल्या नातेवाईकांचा जामीन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साॅलव्हन्सी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 1 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शहादा तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे नातेवाईक यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात ते सध्या जिल्हा कारागृह नंदुरबार येथे अटकेत आहेत. तक्रारदार यांच्या नातेवाईकांचा जामीन करण्यासाठी त्यांना साॅलव्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. तक्रारदार यांनी साॅलव्हन्सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तहसील कार्यालय शहादा येथे अर्ज केला असता , आलोसे पंकज दिगंबर आयलापूरकर, कनिष्ठ लिपिक, तहसील कार्यालय, शहादा यांनी साॅलव्हन्सी प्रमाणपत्र देण्याच्या कामात मदत करण्याचे मोबदल्यात 1000 रुपये लाचेची मागणी केली.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 13 मे रोजी कृष्णा सुदाम जगदेव रा. भादे, ता. शहादा या खाजगी ईसमास 1000 रु. साक्षीदारांसमोर स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून पंकज दिगंबर आयलापूरकर, कृष्णा सुदाम जगदेव या दोघांना
तहसील कार्यालय, शहादा येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र, नाशिक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक, माधवी स. वाघ, पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ,पोह विलास पाटील, पोना अमोल मराठे, मपोना ज्योती पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना संदीप नावाडेकर, पोना देवराम गावित व चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने कार्यवाही केली.
नंदूरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.