नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील विविध गावांतील संभाव्य पाणी टंचाई आणि त्यावरील उपाय योजना संदर्भात आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात खंडित वीज पुरवठ्यामुळे घामांच्या धारेत पाणी टंचाई आढावा बैठक उरकण्यात आली. याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पाणी टंचाई संदर्भात काही उपायोजना घ्यायचे असतील तर त्या तातडीने दोन दिवसात प्रस्ताव संबंधित अधिकारी यांच्याकडे सादर करन्याच्या सूचना दिल्या
नंदुरबार पंचायत समितीच्या हेमलता वळवी सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विजयकुमार गावित होते. या बैठकीस पंचायत समिती सभापती प्रकाश गावित, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सहाय्यक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, सदस्य दीपक पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, गावातील सर्वेक्षण करणे गरजेचे असून घनकचरा व्यवस्थापनासह पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करायचे आहे. प्रशासनासह सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थ सर्वांनी सामूहिक रित्या ही जबाबदारी पेलण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षण दरम्यान गावातील खुले प्लॉट किंवा बांधकाम सुरू असलेल्या जागांवर सुद्धा पाणी पुरवठा संदर्भात उपाययोजना करण्यात यावी. इतर राज्याप्रमाणे रोजगार हमी योजनेच्या कामावर यंत्राद्वारे कामकाज करण्यात येते. त्यानुसार आपल्या भागात देखील प्रयोग करण्यास हरकत नसल्याचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. पाणी टंचाई आढावा बैठकीत संदर्भात माहिती देण्यासाठी पाणीपुरवठा अभियंता, तालुक्यातील प्रत्येक गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आवर्जून उपस्थित होते. यावेळी आमदार विजयकुमार गावित यांनी गाव निहाय संभाव्य पाणी टंचाई संदर्भात प्रत्येक ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधून माहिती जाणून घेतली.
पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा बैठक सुरू असताना तब्बल दीड तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आमदार डॉ. विजय कुमार गावित यांनी संताप व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी टंचाई संदर्भात काही उपायोजना घ्यायचे असतील तर त्या तातडीने दोन दिवसात प्रस्ताव संबंधित अधिकारी यांच्याकडे सादर करावेत जसे विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहीर, तात्पुरती पाणी पुरवठा योजना ,हात पंप दुरुस्ती, विहीर खोलीकरण इत्यादी आदी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.








