नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात साठा करून ठेवलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधील एका सिलिंडर लिकेज झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाल्याची घटना दि.५ मे रोजी रात्री नऊ वाजता घडली. तातडीने लिकेज झालेला सिलिंडर सुरक्षीत स्थळी नेण्यात आल्याने अनर्थ टळला.दरम्यान यात कुणालाही ईजा नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्हा रुग्णालयात गुरुवारी दि.५ मे रोजी दुपारी धुळे येथून आलेले ऑक्सिजन सिलिंडर त्यातील जम्बो सिलिंडर नेहमीप्रमाणे साठा करून एका ठिकाणी ठेवलेले होते. त्यातील एक सिलिंडर रात्री 9 वाजेदर्म्यान खाली पडल्याने आवाज झाला. त्यातून अचानक ऑक्सिजन बाहेर निघू लागला. सर्वत्र धूर पसरला होता. परंतू वेळीच रुग्णालय प्रशासनाने सिलिंडर बाजूला नेऊन त्याचे लिकेज बंद केले. यावेळी रुग्णालयात एकच धावपळ झाली.नातेवाईकांमध्ये भिती निर्माण झाली होती. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी केली. यात कुणालाही ईजा झाली नसल्याचे यामुळे मात्र रुग्ण आणि डॉ. सातपुते यांनी स्पष्ट केले.