नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खुटमालपाडा ते मोलगी रस्त्यावरील बिजरी गावाजवळील दरीत ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने ट्रॉलीखाली दाबला गेल्याने १३ वर्षीय बालक ठार तर मजूरांनाही दुखापत झाली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा चनवाईपाडा येथील रमेश बामण्या वळवी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरट्रॉलीने (क्र.एम.एच.३९ एन १७२४) खुटमालपाडा ते मोलगी रस्त्याने मजूरांना घेवून जात होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून बिजरीगव्हाण गावाच्या शिवारातील रस्त्याजवळील दरीत उलटल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात विलास जलसिंग वसावे (वय १३, रा.भगदरीचा खुटमालपाडा ता.अक्कलकुवा) या बालकाचा ट्रॉलीखाली दबला गेल्याने मृत्यू झाला तर मजूरांनाही दुखापत झाली. याबाबत जलसिंग माकत्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात रमेश वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३६, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.