कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आणि अपेक्षित ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.नारायण बावा आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, खाजगी रुग्णालयात देखील ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा. ऑक्सिजनबाबत आवश्यक नियोजन करण्याबाबत रुग्णालयांना सूचना देण्यात याव्यात. नवापूर येथे अधिकच्या ऑक्सिजन बेड्सचे नियोजन करावे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणीदेखील अधिक प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे.
कोरोना बाधित आढळल्यानंतर संपर्क साखळी शोधण्यावर विशेष भर द्यावा. रेल्वे आणि बस स्थानकाच्या ठिकाणी अँटीजन चाचण्यांसाठी पथक नेमण्यात यावेत. शाळेतील शिक्षक अथवा विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्यास शाळा बंद ठेवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आवश्यक पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. कोविड केअर सेंटरमधील बेड्सची सुविधा, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना चाचण्या आदी विविध विषयांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.