खापर l प्रतिनिधी
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर ते गव्हाली दरम्यान हॉटेल्स व ढाब्यावर बायोडिझेलची विक्री सुरू आहे.महसूल व पोलीस विभागाने अर्थपूर्ण संरक्षण मिळत असल्याने अवैध बायोडिझेल विक्रेते जोमात आले आहेत. दिवसांत हजारो लिटरच्या खपत मागे लाखों रुपयांची उलाढाल होत असून उघळ्या डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रकारावर तालुक्यातील अधिकाऱ्यांही डोळे मिटल्याने त्यांना वरकमाई मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
महामार्गावरून दळणवळण करतांना सर्वसामान्यांना हॉटेल्स व ढाब्यावर विकले जाणारे बायोडिझेल सहजचं दिसते,पण तालुक्यातील प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे “डोळे असून आंधळे” असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.यात पोलीस विभागात गोपनीय माहीती ठेवणाऱ्या डी.बी.पथकाला उघडपणे बायोडिझेलच्या विक्रीची माहितीच नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाई नंतर विक्रेते पुन्हा सक्रिय झाले आहे.हॉटेल्स व ढाब्यांवर बायोडिझेल विक्री करतांना आढळल्यास विक्रेत्यांसह जमीन मालकांवर सुध्दा कारवाई होईल असे सक्तीचे आदेश प्रांत डॉ. मैनाक घोष यांनी अगोदर झालेल्या छाप्या दरम्यान सांगितले होते,ज्यामुळे आता बायोडिझेल विक्रेत्यांनी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे,ज्यात चक्क चालत्या फिरत्या मालवाहतूक गाळीतच धंदा सुरू केला आहे.एका ठिकाणी गोदामात संग्रह करायचा व तेथुन लहान मालवाहतूक गाड्याच्या साहाय्याने हॉटेल्स व ढाब्यावर विकायचे असला प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे.
अक्कलकुवा तालुक्यात ४-५ हॉटेल्स व ढाब्यावर सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीमध्ये दिवसाला ५ लाखाच्या वर उलाढाल होते.एकंदरीत महिण्याचा हिशोब केला तर १ कोटींचा वर आकडा जातो.ज्यांची पोलीस व महसूल विभागाला जाणीव असून वरकमाई मिळत असल्याने कारवाई ऐवजी छुपे संरक्षण दिले जात असल्याचे बोलले जात आहे.ज्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर झाली असून अवैध धंदे फोफावत आहे.प्रशासनाला कधी जाग येते याकडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे .










