तळोदा l प्रतिनिधी
एका लग्नाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने तरुणास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा शहरात घडली. या प्रकरणी चौघाविरुद्ध तळोदा पोलिसात ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील एका हट्टीत शुक्रवारी लग्नाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संदीप सुनील पाडवी (वय 18) रा.कोहली हट्टी, तळोदा हादेखील नाचत होता. नाचताना त्याचा धक्का लागल्याने लव सोना पाडवी, कुश सोना पाडवी, सूरज रवींद्र पाडवी, रोहित रवी पाडवी सर्व रा.पाडवी गल्ली, तळोदा यांनी संदीप यास बेदम मारहाण केली.त्यामुळे त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेताना त्याचा मृत्यू पावला.या प्रकरणी विजयसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपी विरोधात खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत. याप्रकरणी चारही संशयित आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान नंदुरबार येथून फॉरेन्सिक लॅब पथकही मागविण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळी भेट दिली.








