नवापूर | प्रतिनिधी
चिंचपाडा-विसरवाडी रस्त्यावर वनविभागाच्या गस्तीपथकाने वाहनातून २ लाख रुपयांचे खैरजातीचे अवैध लाकूड जप्त केले आहे. वाहनासह एकुण ४ लाख ५० हजार रुपयांचा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, वाहनधारक अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनविभागाचे पथक चिंचपाडा ते विसरवाडी रस्त्याने गस्त करताना विसरवाडी येथील हार्दिक पेट्रोल पंपाजवळ पिकअप वाहन (क्र.जीजे १७ युयु ४५९४) थांबवून तपासणी केली असता त्यात विनापास खैर प्रजातीचे अवैध लाकुड आढळून आले.वाहनचालक अंतराचा फायदा घेवून पसार झाला. सदर वाहन जप्त करून नंदुरबार आगार डेपो येथे जमा करण्यात आला. सदर मालाची अंदाजित किंमत २ लाख रुपये असून अंदाजित २ ते २.५ टन खैर माल आहे. वाहनाची अंदाजित २ लाख ५० हजार असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कार्यवाही वनसंरक्षक पगार, कृष्णा भवर, विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे श्रीमती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा शिवाजी रत्नपारखे, स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.