नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्त प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार व जि.प.शाळा वैजाली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
चित्रकला रंगभरण स्पर्धा, शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप कार्यक्रम प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण साळुंखे, माजी सरपंच विनोद पाटील,भटू महिरे, किरण महिरे व शाळेतील शिक्षक विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक राजू मोरे यांनी मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती दिली.भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श , मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वांतत्र्यपूर्व भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. असेही मत व्यक्त केले. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली, त्यांच्यामध्ये लढाऊवृत्ती निर्माण करुन समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन , गोलमेज परिषद, पुणे करार , स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, स्त्री – पुरुष समानतेच्या दृष्टीने मूलभूत कार्य अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजामधील तळागाळातील व्यक्तीचा प्रामुख्याने विचार केला. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रेरणादायी संदेश दिला . विविध भाषा , धर्म , पंथ व जातीमध्ये विभागलेल्या भारताला संविधानाच्या माध्यमातून एक देश म्हणून एकसंध केले. असेही मत व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शिक्षक राजू मोरे, चंदू पाटील उषा पाटील, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांचे सुत्रसंचलन व आभार शिक्षक भरत पावरा यांनी मानले.