नंदुरबार l प्रतिनिधी
समता हे आपल्या संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या दृष्टीने जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘अनुभव लेखन कशासाठी ?- लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम आयोजित केला असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बांगडे यांनी केले आहे.
स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. या सीमॉन द बोव्हारच्या वाक्यातील मर्म आपण सारे जाणतो; आणि म्हणून पुरुषही जन्माला येत नाही, तर तोही घडवला जातो, याची जाणीवही सीमॉनचे हे वाक्य आपल्याला करून देते. स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसे वागावे, याविषयी आपल्या पुरुषप्रधान समाजाच्या पारंपरिक चौकटी ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार सर्वांना लहानपणापासून वाढवले जाते. ह्या चौकटी जाचक ठरायला लागल्यावर काही व्यक्तींनी स्त्री, पुरुष, तृतीय पंथी त्या नाकारायला सुरुवात करून सांविधानिक समतेची कास घरलेली दिसते आहे. या उपक्रमासाठी स्त्री पुरुष, तृतीय पंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव लिहून ते 25 मार्चपर्यंत पाठवायचे आहेत. आपले हे अनुभव इतरांनाही लिंगभाव समता आणण्यासाठी प्रेरणादायी ठरतील.
आपल्या अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागल्या असल्या, तरी आजही घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनेत अल्प आहे. त्यासाठीही अनेकींना त्यांच्या त्याच्या पातळीवर लहान मोठे संघर्ष करावे लागत आहेत. हे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवरील असतात, तर कधी नोकरी-व्यवसायातील प्रत्येकीने कधी ना कधी लिंगभाव असमानतेला तोंड दिलेले असते आणि सावकाश का होईना, काही प्रमाणात का असेना ती असमानता समानतेकडे झुकवण्यात ती यशस्वीही झालेली असते. असे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवर सातच्या आत घरात येण्याचे असतील किंवा घरकाम, शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न, मुलाचे संगोपन इ. साठीचे असतील, तर कधी नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मिळालेल्या भेदभावाचे असतील. पुरुषप्रधानता केवळ स्त्रियांच्या विकासालाच मारक आहे असे नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी पुरुष आणि तृतीय पंथी यांचाही ही पुरुषप्रधानता तितकाच कोंडमारा करते.
पुरुषांसाठी तुमच्या नात्यातल्या आई,बहीण,मुलगी,पत्नी इत्यादी किंवा मैत्रीण, कार्यालयीन सहकारी यांच्यावर बाई म्हणून होत असलेल्या अन्यायावर तुम्ही काय भूमिका घेतली ? त्या स्त्रीच्या संघर्षात तुम्ही कसे सहकार्य केलेत याविषयावर तर तृतीय पंथीयांसाठी स्त्री- पुरुष यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, याची जाणीव झाल्यावर आपल्या कुटूंबाने,नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी तुम्हांला स्वीकारले का ? त्यांची काय भूमिका होती. त्यांच्या प्रतिक्रियांना, वागण्याला तुम्ही कसे तोंड दिले किंवा कसे स्वीकारले या विषयीचे अनुभून लिहून पाठवायचे आहेत.
हे अनुभव लेखन उपक्रम सर्वांसाठी खुले असून संबंधितांनी आपले अनुभव मराठीत लिहावेत. लिखानाची शब्दमर्यादा 700 ते 1200 शब्द असावी तसेच लेखन हे अनुभवाधारित असावे, काल्पनिक नसावे.25 फेब्रुवारी 22 ते 25 मार्च 2022 या कालावधीत आलेले लेखनच ग्राह्य धरण्यात येईल. एखाद्या सहभागीच्या अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर व्यक्तींची राहील.
स्पर्धेत सहभाग होणाऱ्यांनी आपले अनुभव लेखन 25 मार्च 2022 पर्यंत https://forms.gle/EjnmX6jvspa7cEh48 या गूगल अर्जावरील माहिती भरुन त्यावर पाठवावे. या उपक्रमांतर्गत आलेल्या निवडक लेखाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. तसेच निवडक लेखांना ‘पुन्हा स्त्री उवाच’ या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. सदर उपक्रमाची अधिक माहिती https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा 8669058325 (प्रणव सलगरकर) या क्रमांकावर संपर्क साधावा.