नंदुरबार | प्रतिनिधी-
पोलीस महासंचालकांनी सन-२०२१ साठी राज्यातील सर्व पोलीस घटकांचे दोषसिध्दी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले असता नंदुरबार जिल्हा पोलीस घटकात गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण ९२.१३ टक्के इतके असल्याने महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला आहे. याबाबतचे पत्र जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाले आहे.
नंदुरबार जिल्हयात गुन्हे अपराधसिध्दी व गुन्हे प्रतिबंध व उघडकीस आणणे करिता नेहमीच विविध उपाययोजना राबविण्यात येतात. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत खालील कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत. तपास वेळेत व उत्कृष्ट करणे, समन्स वॉरंट बजावणीबाबत पोलीस ठाणे प्रभारी व संबंधित अंमलदार यांनी दैनंदिन आढावा घेणे, पोलीस अधिकारी/अंमलदार व सरकारी वकील यांनी साक्षी अगोदर एकमेकांशी संपर्क व समन्वय ठेवणे, पोलीस साक्षीदार व तपास अधिकारी यांची दररोज मुलाखत घेणे, उत्कृष्ट तपास व गुन्हे शाबीतीकरीता प्रोत्साहनपर बक्षिस तसेच प्रमाणपत्र वाटप करणे, या अनुषंगाने गुन्हे दोषसिध्दीकामी नियोजनबध्द कामकाज करण्यात येत आहे. नंदुरबार पोलीस दलामार्फत ५ कलमी कोर्ट कमिटमेंट उपक्रम राबविला असल्याने अतिगंभीर/गंभीर गुन्हयामधील आरोपीतांना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. आरोपीतांना गुन्हयात शिक्षा झाल्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा वचक निर्माण करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे. नंदुरबार जिल्हयात आरोपीतांना गुन्हयात शिक्षा व्हावी याकरीता आरोपीतांना शिक्षेच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामध्ये समन्स वॉरंट बजावणीत सरकारी वकील, पोलीस अधिकारी, कोर्ट पैरवी अंमलदार यांच्यात समन्वय साधला जातो. जिल्हयात व जिल्हयाबाहेरील समन्स, जामीनपात्र वॉरंट, अजामीनपात्र वॉरंट यांचे बजावणी प्रभावीपणे व परीणामकारक झाल्यामुळे गुन्हयातील साक्षीदार, आरोपी, पंच व इतर इसम यांचे न्यायालयात हजर राहण्याचे प्रमाण वाढल्याने व खटले चालण्याचे प्रमाण वाढल्याने कमी कालावधीत खटल्यांचा निकाल लागत असल्याने सहाजीकच गंभीर गुन्हयातील आरोपीतांना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे. नंदुरबार जिल्हयातील खटल्यांचे सन-२०२१ मध्ये एकंदर शिक्षेचे प्रमाण ९२.१३ टक्के आहे.
तपास अधिकार्यांनी केलेल्या गंभीर गुन्हयाचे तपासात न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात दोषसिध्दी झाल्यावर तपासी अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी, मुख्य पैरवी अधिकारी यांना प्रोत्साहनपर रोख स्वरुपात रक्कम बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच निवृत्त पोलीस तपासी अधिकारी/अंमलदार यांना त्यांनी केलेल्या गुन्हे तपासात दोषसिध्दी झाल्यावर त्यांना देखील बोलावून शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात येतो व सरकारी अभियोक्ता/वकील यांचाही शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात येतो. पोलीस दल व सरकारी वकील/अभियोक्ता यांच्यात झालेल्या समन्वयामुळे नंदुरबार जिल्हयात दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी सन-२०२१ साठी राज्यातील सर्व पोलीस घटकांचे दोषसिध्दी प्रमाणाचे विश्लेषणात्मक परीक्षण केले असता नंदुरबार जिल्हा पोलीस घटकात गुन्हेगारांना शिक्षा लागण्याचे प्रमाण ९२.१३ टक्के इतके असल्याने महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्हा अव्वल ठरला आहे.