नंदुरबार ! प्रतिनिधी
चांगली आणि मोठी कामे उभी राहायची असतील तर निरपेक्ष भावनेनं काम करण्यासाठी निपरेक्ष भावनेनं काम करायला हवं, असं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केलं. ‘सरहद पुणे’ आणि ‘लडाख पोलिस’ यांच्या वतीने राष्ट्रीय कारगिल विजय दिनानिमित्त आणि गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वनिमित्त शहिदांना अभिवादन आणि राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानिमित्त ते बोलत होते.
यावेळी कारगिल मॅरॅथॉनचे संजीव शहा, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे इथं झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमात लेह-कारगीलचे एक्झिक्युटिव्ह कौन्सेलर आगा सय्यद अब्बास रिझवी, कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे ब्रँड अंबेसिडर आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध विभागातील ७ व्यक्तींसह मालेगावचे डॉ.अपश्चिम बरंठ व धडगाव येथे आरोग्य अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले मालेगांवचे डॉ.विजय शंकर कळमकर यांना “राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार २०२१” प्रदान करण्यात आला.
डॉ.कळमकर यांना प्रामुख्याने ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्र या संस्थेद्वारे केलेले सामाजिक कार्य आणि आरोग्य अधिकारी म्हणून अतिदुर्गम आदिवासी भागात कोविड-१९ चे कार्य यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.
IPS कृष्ण प्रकाश मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, जिथं श्वास घेणंही कठीण होतं, त्या कारगिल भागात आपले सैनिक देशाच्या श्वासासाठी लढत होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. सैनिक देशासाठी एवढं करू शकतात, तर आपण स्वतःसाठी काही गोष्टी का करू शकत नाही. रोज व्यायामासाठी आपण वेळ का काढू शकत नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नहार यांनी केले, तर संजीव शहा यांनी आभार मानले.