म्हसावद | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे एकाच रात्री सहा दुकाने फोडली.महिन्याभरात ही दुसरी घटना असून गेल्या महिन्यात फोडलेल्या दुकानास दुसर्यादा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.यात पाच हजाराचा मोबाईल चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे.याबाबत म्हसावद पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत वृत्त असे की,शुक्रवारी रात्री म्हसावद, ता.शहादा येथे एकाच रात्रीत सहा दुकाने फोडण्यात आली तर एका दुकानात दुसर्यांदा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात गुरूकृपा कृषी सेवा केंद्र या दुकानातून पाच हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरी करण्यात आला आहे.याबाबत सागर राजाराम पाटील यांच्या फिर्यादीनुसार म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानाजवळचे महालक्ष्मी किराणा दुकान, वसंत शंकर ज्वेलर्स,कलश ज्वेलर्स, पंचकृष्ण हॉटेल,श्री.चामुंडा ट्रेडींग होलसेल किराणा ही दुकाने फोडण्यात आली.येथून एक रूपयाची चोरी झाली नाही हे विशेष, तर गेल्या महिन्यात एक जानेवारीला फोडलेले शिव ज्वेलर्स पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केला पण यश आले आहे.दुकाने फोडली पण चोरी झाली नाही.या मागे काहीतरी गौडबंगाल आहे. एका महिन्यात दुसर्यांदा धाडसी दुकान फोडी झाल्यावर म्हसावद पोलीसांचा कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रात्रीतून पोलीस गाडीवर गस्त करताना गाडीचा सायरन वाजवत फिरतात तर चोर सापडतील का? सायरन का वाजवावा ? केव्हा वाजवावा ? याची नियमावली पोलीसांनी जाणून घेणे महत्वाचे आहे.दहा वर्षापासून रात्रीची गस्त म्हणजे येरे माझ्या मागल्या या प्रमाणे म्हसावद पोलीसांचे सुरू आहे.रात्रीतून गस्त घालताना सायरन वाजवणे कितपत योग्य आहे? सहा दुकाने फोडली पण चोरीच झाली नाही हा पण आश्चर्याचा भाग आहे.यामुळे एकानेच चोरीची फिर्याद दिली आहे.
मात्र म्हसावद पोलीसांचा मस्त व सुस्त कारभारामुळे चोरटे वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. याबाबत वरीष्ठांनी दखल देणे गरजेचे झाले आहे. या धाडसी चोरीमुळे मात्र म्हसावद ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे.
म्हसावद पोलीसांनी या चोरट्यांचा छडा लावून बंदोबस्त करावा.एक महिन्यापुर्वी फोडलेली दोन दुकाने व ही सात दुकाने फोडताना एक सारखीच पध्दत वापरली गेली आहे.म्हणजे चोरटे तेच असावेत असा कयास लावला जात आहे.अनेक दुकानातील व चौकातील सी.सी.टी. व्ही. फुटेज मध्ये चोरांच्या हालचाली कॅमेराबंद झाल्या आहे.म्हसावद पोलीस आता काय कार्यवाही करतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.म्हसावद पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ४५७,३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्दर्शनाखाली पो.कॉ.खंडू धनगर तपास करीत आहे.
म्हसावद व परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे.मागिल महिन्यात अशीच चोरी झाली होती आत्ता परत ही चोरी झाली.याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांना झाला आहे तरी म्हसावद पोलिसांनी म्हसावद सह परिसरात पोलिस गस्त वाढविने गरजेचे झाले आहे.
डॉ.सुरेश नाईक
अध्यक्ष, शहादा तालुका कोंग्रेस कमिटी








