नंदूरबार l प्रतिनिधी
पुरुषांकडुन महिलांवर होणाऱ्या मानसिक व शारीरीक त्रासामुळे तसेच कौटुंबिक कलहामध्ये समुपदेशनाद्वारे संसार जोडण्याचे काम नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे महिला सहाय्यता कक्ष करत आहे . या अंतर्गत सन 2021 मध्ये महिला सहायता कक्षाकडे महिलांच्या अत्याचाराबाबत 352 अर्ज केले होते . त्यापैकी 148 कौटुंबिक कलह सामोपचाराने तसेच समुपदेशनाने मिटवून त्यांचे संसार सुरळीत व सुव्यवस्थीत सुरु करण्याचे काम महिला सहाय्यता कक्षाने केले आहे .
महिलांवरील अन्याय आणि विशेषतः कौटुंबिक कलह निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस मुख्यालयांतर्गत असे महिला कक्ष कार्यरत आहे . त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्यता कक्ष कार्यरत आहे . कक्षातील अधिकारी व अमंलदार हे तक्रारदार महिला व तिचे सासरकडील कुटुंब अशा दोघांचे समुपदेशन करुन त्यांचा संसार सुरळीतपणे चालविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात . विशेषत : लॉकडाऊनमध्ये तसेच बेरोजगारीमुळे घरात असल्याने व आर्थिक कारणांनी काही घरात पती- पत्नी , सासु – सुन , मुलगा- वडील अशा अनेक नात्यांमध्ये तक्रारी व भांडणे होवु लागली त्यामुळे कौटुंबिक कलह मोठया प्रमाणात वाढले होते . कोविडच्या दुसऱ्या व तिस – या लाटेमुळे घरातील कौंटुंबिक कलह अजुन मोठ्या प्रमाणात सुरु झाले . सन 2021 या वर्षात कौटूंबीक कलहाच्या अशा सुमारे 352 तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला सहायता कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या . यामध्ये प्रामुख्याने पती व पत्नी यांचे विवाहबाह्य संबंध , सासु – सुनेचे कौटूंबीक वाद , तसेच पतीने किंवा पत्नीने एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे अशा विविध तक्रारींचा समावेश होता . महिला सहायता प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांपैकी जास्तीत जास्त तक्रार अर्ज हे मध्यमवर्गीय कुटूंबातील आहेत . उच्च शिक्षीत पती – पत्नी तसेच नोकरदार पती – पत्नी व एकत्र कुटूंबातील तक्रारदारांचा महिला सहायता कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा समावेश आहे . तर मध्यमवर्गीय व कमी उत्पन्न घटकातील
महिलांच्या तक्रारींमध्ये समजोता होवून संसार जुळवून येण्याच्या प्रमाणात वाढ आहे . त्या तुलनेत उच्च शिक्षीत पती – पत्नींचे संसार जुळवून येण्याचे प्रमाण कमी आहे . सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येकाकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप , फेसबुकमुळे व इतर समाज माध्यमांमुळे पती – पत्नीच्या संशयी वृत्तीत वाढ झाली असून त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होवून अशा काळात पत्नीने रागात माहेरी निघून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून कौटूंबीक कलह वाढीस लागले होते . अशा कौटूंबीक कलहामुळे वेगळ्या झालेल्या दाम्पत्यांच्या आयुष्यात महिला सहायता कक्षाकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून गैर समज दूर करून त्यांच्या तुटलेल्या कौटूंबीक गाठी पुन्हा जुळवून आणण्याचे काम केले आहे . तक्रारदार महिलेचा अर्ज महिला सहायता कक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांना 3 ते 4 वेळा समुपदेशनासाठी महिला कक्ष येथे बोलविले जाते . ज्या प्रकरणांमध्ये पती – पत्नीमध्ये तडजोड शक्य आहे.अशा कुटूंबांना अधिकचा वेळ देवून त्यांच्यात असलेला दुरावा कमी करून त्यांचा संसार सुरुळीत केला जातो . तक्रारदार महिला व त्यांचे कुटुंबीय यांना भविष्यात होणाऱ्या परिणामाची माहिती देवून देखील बाद न मिटल्यास अशा वेळी संबधीत गैरअर्जदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो . कौटुंबिक कलहातून पतीने घराबाहेर काढलेल्या महिलांना कक्षातील अधिकारी व अमंलदार यांनी आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने घरगुती गृह उद्योग सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केल्याने काही तक्रारदार महिलांना स्वतःचा गृह उद्योग सुरु केला आहे . पिडीत महिलांना तात्काळ पोलीस मदत मिळावी म्हणुन संपूर्ण राज्यात 1091 हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे . सदर कक्षात महिलांविषयक कौटुंबिक तक्रारीचे निवारण करण्यात येते . पतीचे तुटपुंजे आर्थिक उत्पन्न पती – पत्नीमधील किरकोळ वाद , सासु – सुनेचे किरकोळ वाद , मुलांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे निर्माण होणारे वाद यामुळे काटूंबीक कलह निर्माण होत असून संयमी वृत्ती ठेवल्यास यातून मार्ग निघू शकतो व तुटण्यात आलेला संसार पुन्हा फुलू शकतो . पती – पत्नी यांनी समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करून मुलांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले . आलेल्या तक्रारी मिटवून पुन्हा सुरळीत संसार व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यता कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , सहा . पो उप निरीक्षक भगवान धात्रक , महिला पोहेकॉ प्रमिला वळवी , महिला पोहेकॉ विजया बोराडे , महिला पोहेको प्रिती गावीत , महिला पो . शि अरुणा मावची हे प्रयत्नशील असतात .