म्हसावद l प्रतिनिधी
इयत्ता दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असून पुर्वपरीक्षा सुरू आहे मात्र एसटी बस संपामुळे खेड्यावरून येणारे विद्यार्थी यांचे भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत असून खाजगी प्रवासी वाहने दुप्पटीचे भाडे वसूल करीत आहे.एसटी बंद असल्याने गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
याबाबत वृत्त असे की,शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा तोडगा अद्यापही सुटलेला नसल्याने या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणासाठी मोठ्या गावात शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन खासगी वाहन धारकाकडून होणारी लुट बघता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही टाळले असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जनजीवन पुर्वपदावर येत आहे.मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी शासन विलगीकरणाच्या मागणीला घेऊन मागील दोन महिन्यांपासून बंद पुकारला असल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत तर पालकाची कोंडमारी होते आहे. प्रवाशांसह आजारी रूग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना तालूका व शहरीस्थळी येण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे यातच खाजगी वाहनधारकाकडुन अवाजवी भाडे आकारले जात असल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त आहेत.कोरोनामुळे आधीच पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.त्यात दुष्काळात तेरावा महिना एसटी पण बंद झाली आहे.परिणामी विद्यार्थी, प्रवासीवर्ग हैराण झाला आहे.
शाळा सुरळीत झाल्या असून दहावीची पुर्वपरीक्षा सुरू आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे नंतर लगेच दहावीची परीक्षा मात्र एसटी बंद असल्याने सर्व खेळखंडोबा झालाय.गरीब आदिवासी विद्यार्थींना खाजगी वाहनात दुप्पटीचे भाडे देवून यावे लागत आहे.दररोजचा आर्थिक खर्च न परवडणारा असल्याने पालकवर्ग त्रस्त झाला आहे. एसटी बस लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा व होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.
श्रीमती सुरेखा गूजर, मुख्याध्यापिका
सती गोदावरी माता विद्यालय म्हसावद ता.शहादा