नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतरत्न, गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, राजकारण म्हटलं म्हणजे अनेक वेळा ताण तणाव आलाच. राजकारण आणि ताण तणाव हे समीकरणच आहे. ज्या-ज्या वेळी तणावाला सामोरे जावे लागले त्या-त्या वेळी मी लतादीदींचे स्वरमयी गाणे ऐकत बसायचो.झराळी येथील फार्म हाऊसवर गेलो कि एकांतात लतादीदींची अनेक जुनी गाणी ऐकल्याने तणावातून मुक्त व्हायचो. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी माझ्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यावेळी देखील लतादीदींचे संगीत ऐकत होतो. संगीत ऐकल्याने सर्व चिंतेतून माणूस मुक्त होत असल्याचा प्रत्यय आला.
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले, स्व.लता मंगेशकर यांचे व खानदेशचे अगदी जवळचं नातं आहे. त्या खान्देशकन्या असून, त्यांच्या आईचे माहेर शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील असल्याचे त्यांनी आठवण करून दिली.








