नंदुरबार | प्रतिनिधी
जापान येथे होऊ घातलेल्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना घवघवीत यश लाभावे व देशाचे नाव त्यांच्या माध्यमातून उज्ज्वल व्हावे, या हेतूने श्रॉफ हायस्कूलतर्फे चिअर फॉर इंडिया हा कार्यक्रम घेण्यात आला. एकात एक गुंफलेले ऑलम्पिक चिन्हाचे रिंग या कार्यक्रमाप्रसंगी साकारण्यात आले होते.
२०२० मध्ये आयोजित करण्यात आलेला ऑलम्पिक खेळ महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. जपानमध्ये आता पुन्हा उद्या दि.२३ जुलैपासून या ऑल्मपिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिंपिकमध्ये २७० खेळाडूंचा भला मोठा भारतीय संघ जपानमध्ये दाखल झाला आहे. या संघात दहा खेळाडू महाराष्ट्र राज्यातील आहेत. देशाचे नाव उज्ज्वल व्हावे, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून स्पर्धा जिंकता यावी, या हेतूने येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रॉफ हायस्कूलमध्ये शुभेच्छा देण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला गेला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा, मुकेश बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहित सोनार या विद्यार्थ्याने ओलिंपिक खेळाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. तर शिक्षक जावेद धोबी यांनी ऑलम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंचा परिचय करून दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी देशाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच पॅरा ऑलिंपिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू सहभागी झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन सीमा पाटील तर आभार जावेद धोबी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक भिकू त्रिवेदी, जगदीश वंजारी, कलाशिक्षक महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, शिवाजी माळी, किशोर रौंदळ, नरेंद्र सुर्यवंशी, हेमंत लोहार, सुनील राणा आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. वरील कार्यक्रमाप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.