तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील लाखापुर (फॉ.) येथील शेतकरी दिवाकर नथ्था पवार यांचे गट नंबर 34 मधील सहा एकरातील दोन एकर ऊसाला एका माथेफिरूने आग लावल्याने ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवार रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सदरील शेतकऱ्याने सहा एकरात मागील वर्षी ऊसाची लागवड केलेली आहे. गावकऱ्यांना दुपारी अचानक शेताकडे आग लागल्याचे दिसल्याने गावातील तरुण व शेतकरी आगीच्या दिशेने धावत आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदरील घटना दिवसा घडल्याने गावातील तरुणांच्या सहाय्यामुळे सहा एकरातील चार एकर ऊस वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा जीवात जीव आला. सदरील ऊस तोडणीचा नोंद निंभोरा येथील खांडसरी मध्ये करण्यात आली असल्याने तात्काळ ऊस तोडणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु ऊस जळीत केलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर दंडात्मक कार्यवाही करावी तसेच असे प्रकार थांबविण्यात यावे अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.