नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर येथील शितल सोसायटीमध्ये बंद घराचे खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरटयांनी रोख रक्कमेसह ६ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील शितल सोसायटीमध्ये राहणारे विजयकुमार अग्रवाल हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. दि.१७ जुलै १९ जुलै दरम्यान अज्ञात चोरटयांनी त्यांच्या राहत्या घराच्या मागील दरवाजा उघडून घरातील किचनरूमची खिडकीची लोखंडी ग्रील कापून खिडकीतून आत घरात प्रवेश करत बेडरूमध्ये असलेल्या लाकडी कपाटातून ५ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १ लाख ७३ हजार रूपये रोख असा ऐकूण ६ लाख ८० हजाराचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. विजयकुमार प्रभातीलाल अग्रवाल हे गावाहून परतल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी खात्रीकरून याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत.