नवापूर l प्रतिनिधी
खांडबारा ते देवमोगरा रस्त्यावर वनक्षेत्रात अतिक्रमण केल्याप्रकरणी एकास वनविभागाच्या पथकाने अटक करून न्यायालयात हजर केले असता संशयितास चार दिवस वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यातील खांडबारा ते देवमोगरा रस्त्यावर कक्ष क्रमांक १६ मध्ये वनविभागाच्या गस्ती पथकाकडून गस्त सुरू असताना या भागात रामसिंग दावजी वळवी रा. शेही ता. नवापूर याने अतिक्रमण केल्याचे समोर आले होते. गस्ती पथकाने संशयित रामसिंग याला तातडीने ताब्यात घेतले होते. त्याच्याविरोधात देवमोगरा वनरक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, त्याला मंगळवारी नवापूर वर्ग एक न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चार दिवसांची वनकोठडी सुनावली. ही कारवाई धुळे विभागीय वनाधिकारी उमेश वावरे, नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमने, वनपाल पी. डी. पवार, वनरक्षक किसन वसावे, नयना हाडस, सीमा शिंदे, अरविंद निकम, भूपेश तांबोळी, भानुदास वाघ, रवींद्र कासे, विशाल शिरसाठ, लालसिंग पवार यांनी केली. २१ जानेवारीपर्यंत वनकोठडी दिली असल्याने संशयितास विसरवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.










