नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ऑफलाइन अध्यापन बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नंदुरबार यांच्याकडे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा पुनर्विचार करून शाळा पूर्ववत सुरू करणे,शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी अपडेट साठी केंद्रस्तरीय विशेष मोहीम राबवावी, जुन्या इमारती शाळा निर्लेखित करणे व अद्यापि कुडा,छपराच्या, कौलारू शाळांना नवीन इमारत मंजुरी देणेबाबत जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन मार्फत मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.मनिषा खत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी, राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, खा. डॉ.हिना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,कार्यकारी अभियंता गणेश भावसार, जि. प.अध्यक्षा ॲड.सिमाताई वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, शिक्षण सभापती अजित नाईक , प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या, जीर्ण इमारती तात्काळ पाडणे व कौलारु , कुडाच्या छतात भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना तात्काळ नवीन इमारत मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती ह्या पडक्या, जीर्ण झाल्या असून त्यातील काही इमारती या कोसळल्या असून काही जिल्हा परिषद शाळेच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या असून , सदर इमारती ह्या कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही व सदर जीर्ण झालेल्या इमारती अचानक कोसळल्यास जिवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही . यास्तव जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या,जुन्या, जीर्ण झालेल्या इमारती पाडणेबाबतचे प्रस्ताव मागील एक वर्षांपासून जमा होवुन देखील नंदुरबार जिल्हा परिषदेने सदर प्रस्तावाकडे आजपावेतो दुर्लक्ष केलेले असून काही एक कार्यवाही केलेली नाही.तसेच विद्यार्थी हे मधल्या सुट्टीत शालेय प्रांगणात खेळत असतात.यातच सदर जीर्ण झालेल्या इमारती कोसळुन विद्यार्थ्यांची जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच काही शालेय इमारतीच्या प्रांगणात विटा पडलेले आहेत , भिंती कोसळलेल्या आहेत.काही जिल्हा परिषद शाळेचे लोखंडी पत्रे उडलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शारिरीक इजा होवुन गंभीर दुखापत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.तरी नंदुरबार जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या , जीर्ण झालेल्या इमारती या तात्काळ पाडणेबाबत आदेश देण्यात यावे.तसेच भारत स्वातंत्र्य होवुन ७५ वर्ष होवुन देखील अद्यापपावेतो नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा ह्या कुडाच्या छपऱ्या,कौलारू छपऱ्यातच भरत आहेत.यामुळे पावसाळ्यात अश्या कौलारु , कुडाच्या छपऱ्यात भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत साप,विंचु ,इतर जंगली जनावरे शिरुन येतात यामुळे देखील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका पोहचु शकतो.असाच प्रकार मागीलवर्षी पिंपळखुटा केंद्रातील जि.प.शाळा गारदापाडा ता.अक्कलकुवा येथे घडला.इ.३ री च्या विद्यार्थिनीच्या अंगावर कौलारु छतावरुन साप पडला. परंतु सदर साप हा बिनविषारी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. कात्री केंद्रातील जि.प.शाळा नलदापाडा , ता.धडगांव येथे देखील शाळा सुरु असतांना कौलारू छतावरुन साप पडला व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढल्याने विद्यार्थी सुखरुप वाचले.अश्या घटना कौलारु व कुडाच्या छपऱ्यात भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत नेहमी घडत असतात.तरी अश्या कौलारु , कुडाच्या छपऱ्यात भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना देखील नवीन इमारती तात्काळ मंजुर करण्यात यावी.शहरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये असणाऱ्या इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणारे वर्ग पूर्णपणे बंद झालेले असून फक्त ऑफलाईन शिक्षणास मुभा देण्यात आलेली आहे.विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासह अनेक तांत्रिक अडचणी असून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ अद्यावत मोबाईल नसणे , मोबाईलची रेंज नसणे, एकाच कुटूंबात वेगवेगळ्यात इयत्तेत शिकत असणारे विद्यार्थी असणे अश्या अनेक अडचणी आहेत . त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन अध्यापन व अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी प्रभावी ठरत आहे.ज्या भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नाही.अश्या भागातील कोरोना संसर्ग नियमावलीचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेत.शाळा सुरू करण्यात यावे.शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यासंदर्भात आदेश निघाले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आधारकार्डमध्ये अनेक चूका असल्याने ( उदा.नाव , जन्मतारीख, लिंग आदी ) ते विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंद होत नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थी शाळाबाह्य दिसतात.तसेच अनेक विद्यार्थ्यांचे नवीन आधारकार्ड काढणे सुद्धा राहिले आहे . तसेच आधारकार्ड नोंदणी केंद्र हे तालुक्याच्या ठिकाणी किंवा बाजारपेठ असलेल्या मोठ्या गावातच आहेत. त्याठिकाणी नेहमी गर्दी असते.त्यामुळे पालक हे विद्यार्थ्यांना तेथे घेवुन जात नाही. तसेच अनेक तांत्रिक अडचणी व कागदपत्रे यांच्या कमतरतेमुळे आधारकार्ड अपडेट होत नाहीत किंवा काढले जात नाहीत.प्रत्येक केंद्र शाळेवर फक्त शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात यावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले आहे.








